
उत्तराखंडमधील उधम सिंग नगर येथील गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात जेवणानंतर 150 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. जेवण केल्यानंतर साधारण एक ते दीड तासाने विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवले.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील पटेल भवनमध्ये अभियांत्रिकीचे 185 विद्यार्थी राहतात. पटेल भवनातील मेस चालकाने विशष भोजन आयोजित केले होते. शाकाहारी विद्यार्थ्यांना पनीर तर मांसाहारी विद्यार्थ्यांना बटर चिकन, नान, भात आणि रसमलाई देण्यात आली होती.
जेवण केल्यानंतर साधारण एक ते दीड तासाने विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. वसतिगृह प्रशासनाने वसतिगृह व्यवस्थापक, वॉर्डन आणि डीन स्टुडंट वेल्फेअर (DSW) यांना याबाबत माहिती दिली. विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या तिन्ही रुग्णवाहिका आणि एका बसद्वारे विद्यार्थ्यांना तातडीने विद्यापीठाच्या रुग्णालयात हलवले. रुग्णालयात प्राथमिक वैद्यकीय उपचारानंतर डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना घरी सोडले. मात्र पाच विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मेस चालक निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ वापरत होता. यापूर्वीही दोनदा अन्नात कीटक आढळल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. याबाबत अनेक तक्रारी करूनही मेस चालकाला बदलण्यात आले नाही. या घटनेच्या चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाने तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

























































