
आखातामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे सोने-चांदीच्या दरांमध्ये रोज उलथापालथ होत आहे. गुरुवारी अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढल्याने कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या होत्या, त्यामुळे सोने-चांदीच्या दरात घसरण झाली होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्ध लवकरच संपवून करार पूर्णत्वास नेण्याचे संकेत दिले. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 90 डॉलरच्याही खाली आल्या. याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर झाला.
शुक्रवारी सराफा बाजारामध्ये सोने-चांदीच्या दरांमध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. सोने जवळपास 1 हजार 663 रुपयांच्या वाढीसह 1 लाख 50 हजार 595 रुपयांवर पोहोचले. तर दुसरीकडे चांदीची चमकही वाढली आहे. चांदीचे दर प्रति किलो 3 हजार 123 रुपयांनी वाढून 2 लाख 42 हजार 776 रुपयांवर पोहोचले आहेत.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 50 हार 400 रुपये तोळा (10 ग्रॅम) झाला असून 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 38 हजार 650 रुपये तोळा आहे. त्यामुळे तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तर एकदा बदलले दर नक्कीच जाणून घ्या.
शुक्रवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याचा दर 2.43 टक्क्यांच्या वाढीसह 4 हजार 213.90 प्रति औन्सवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे, चांदीचा दर 4.78 टक्क्यांने वधारला आणि 67.060 डॉलर प्रति औन्सवर व्यवहार करत आहे.


























































