
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली. तृणमूलच्या खासदार, आमदारांनी वेगळा गट स्थापन करत ममता बॅनर्जी यांना एकटे पाडले. यावर आता तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आक्रमक भूमिका मांडली असून भाजपवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप केला. ‘इंडियन एक्सप्रेस‘ला मुलाखतीत त्यांनी भाजपसह बंडखोरांवरही हल्ला चढवला.
लोभीपणा आणि विश्वासघाताला कोणतीही सीमा नसते. लोकसभा निवडणुकीत दोन-तृतीयांश बहुमतापासून दूर राहिलेला भाजप आता अत्यंत हताश झाला आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत आणखी 40-50 खासदार हवे आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून नव्हे, तर केंद्रीय यंत्रणांचा वापर करून, भीती दाखवून आणि पक्ष फोडूनते हे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महुआ मोईत्रा यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या की, कायदा स्पष्ट आहे. तुम्ही पक्षात कोणताही स्वतंत्र गट किंवा गटबाजी करू शकत नाही. जर हिंमत असेल तर सर्व 20 बंडखोर खासदारांनी आणि 60 आमदारांनी राजीनामे द्यावेत, भाजपमध्ये प्रवेश करावा आणि भाजपच्या तिकिटावर पुन्हा जनतेचा कौल मिळवून दाखवावा. तसेच पक्षाचा नेता ठरवण्याचा अधिकार पक्षाला असतो, विधीमंडळ पक्षाला नाही, त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टीएमसीच्या तरुण नेत्या सायोनी घोष यांच्या भूमिकेवरही महुआ मोईत्रा यांनी नाराजी व्यक्त केली. सायोनी घोष लहान बहिणीसारखी, माझ्या मुलीसारखी आहे. ती अत्यंत कष्टाळू आणि प्रतिभावान आहे. टीएमसीने तिला अवघ्या 5 वर्षांत आमदारकी, राष्ट्रीय युवा अध्यक्षपद आणि जाधवपूरसारखी अत्यंत प्रतिष्ठेची लोकसभा जागा दिली. जेव्हा अशा व्यक्ती भीतीपोटी किंवा इतर कारणांमुळे पक्ष सोडण्याचा विचार करतात, तेव्हा मनाला खूप वेदना होतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
त्या पुढे म्हणाल्या की, कोणताही राजकीय पक्ष परिपूर्ण नसतो, तसा माझा पक्षही नाही. परंतु, फॅसिस्ट शक्तींविरुद्ध लढण्यासाठी माझ्यासाठी तृणमूल काँग्रेस हाच सर्वोत्तम पर्याय आहे आणि मी ममता बॅनर्जी यांच्यासोबतच ठामपणे उभी राहीन, असा पुनरुच्चार महुआ मोईत्रा यांनी शेवटी केला.


























































