समृद्धी महामार्गावर अपघात; ट्रकचालकांच्या समयसुचकतेमुळे सहकाऱ्याचे प्राण वाचले, मेहकर जवळील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर मेहकर जवळ आज, १२ जून रोजी पहाटेच्या सुमारास दोन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एका ट्रेलरचा चालक केबिनमध्ये अडकला होता. मात्र, महामार्गावरून जाणाऱ्या अन्य ट्रकचालकांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकीच्या बळावर केबिनमध्ये फसलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलर क्रमांक (MH 46 DC 1152) चा चालक वसीम अहमद (वय ४०, रा. प्रतापगड, प्रयागराज, उत्तर प्रदेश) हे नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जात होते. पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास मुंबई कॉरिडोरवरील चॅनेल क्रमांक २८७.२०० जवळ त्यांच्या समोर असलेल्या आयशर ट्रक (क्रमांक MH 40 DC 3911) च्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागून येणाऱ्या ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर आयशर ट्रकवर पाठीमागून जोरदार धडकला. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रेलरच्या समोरील भागाचा चक्काचूर होऊन चालक वसीम अहमद आतमध्ये अडकले.

अपघातानंतर चालक वसीम अहमद यांनी केबिनमधून मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकचालकाने आपली गाडी थांबवून मदतीचा प्रयत्न केला. मात्र, केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला काढण्यासाठी अधिक हातांची गरज असल्याचे लक्षात येताच, त्याने महामार्गावरील इतर १० ते १२ वाहनांना थांबण्याची विनंती केली.

अपघाताचे गांभीर्य ओळखून इतर ट्रकचालकांनीही तात्काळ आपली वाहने थांबवली. जखमी चालकाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक असल्याने, या चालकांनी काही मिनिटांसाठी वाहतूक बाजूला सारत युद्धपातळीवर प्रयत्न केले आणि केबिनमध्ये फसलेल्या वसीम अहमद यांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले.

अपघाताची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर नियंत्रण कक्षाने तात्काळ मलकापूर समृद्धी महामार्ग उपकेंद्र (फरदापूर, मेहकर) येथे माहिती दिली. माहिती मिळताच पहाटे ५:४५ वाजता महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल (PC १९०२, १५५९, २७३१), तसेच मेहकर पोलीस स्टेशनचे सुनील नागरे आणि गजानन जायभाये अवघ्या काही मिनिटांत (सकाळी ५:५० वाजता) घटनास्थळी दाखल झाले.