
न्यूझीलंड क्रिकेटचा आधारस्तंभ आणि जागतिक क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज केन विल्यम्सन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 16 वर्षे न्यूझीलंड क्रिकेटची ओळख बनून राहिलेल्या केन विल्यम्सन याने 378 आंतरराष्ट्रीय लढतीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने तडकाफडकी निवृत्ती घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला यजमान संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. जगप्रसिद्ध लॉर्डस मैदानावर झालेला पहिला कसोटी सामना विल्यमसनच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे.
निवृत्तीची घोषणा करताना विल्यमसन भावूक झाला होता. मी गेल्या काही काळापासून यावर विचार करत होतो, पण गेल्या काही दिवसांत मला जाणीव झाली की थांबण्याची हीच योग्य वेळ आहे. मी नेहमीच देशासाठी खेळताना माझे 100 टक्के योगदान दिले आहे. त्यापेक्षा कमी क्षमतेने खेळणे माझ्या तत्त्वात बसत नाही. स्वतःच्या अटींवर निवृत्त होत असल्याचा मला आनंद आहे. हा संघ माझ्यासाठी नेहमीच हृदयाच्या जवळ राहील, असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात विल्यमसन म्हणाला.
New Zealand icon draws curtains on a stellar international career.
More 👇https://t.co/DzDMqhmGqK
— ICC (@ICC) June 12, 2026
नोव्हेंबर 2010 मध्ये हिंदुस्थानविरुद्ध अहमदाबाद कसोटीत पदार्पणातच शतक झळकावून विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आपली दखल घेण्यास भाग पाडले होते. त्याने गेल्या 16 वर्षात न्यूझीलंडकडून 378 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात त्याने 48 शतक आणि 6 द्विशतकांच्या मदतीने 19,346 धावांची बरसात केली.
केनने 40 कसोटी, 91 वनडे आणि 75 टी२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले. 2019 वन डे विश्वचषकामध्ये न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणारा केन ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला होता. तसेच 2021 मध्ये टी-20 विश्वचषकात त्याने संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते.
केनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने 2021 मध्ये हिंदुस्थानचा पराभव करत आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप जिंकण्याचा कारनामा केला होता. तसेच 2015 मध्ये त्याला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर आणि 2019 मध्ये कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. एवढेच नाही तर चार वेळा त्याला सर रिचर्ड हेडली मेडल देऊन गौरविण्यात आले आहे.




























































