
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे काही सांगतात, ते हिंदुस्थान स्वीकारतो. जगात हिंदुस्थानची बाजारपेठ खूप मोठी आहे. परंतु देशाची आर्थिक धोरणे अमेरिकेच्या हिशोबाने बनवली जात आहेत. भाजपा सरकारने देशाची बाजारपेठ गहाण ठेवली आहे. भाजपाचे लोक तोंडाने स्वदेशी आहेत, मात्र मनाने विदेशी आहेत, अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. उत्तर प्रदेश येथील कासगंज येथे एका कार्यक्रमात ते असे म्हणाले आहेत. अमर उजालाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
यावेळी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, “भाजपा सरकार स्मार्ट सिटी तर बनवू शकले नाही, मात्र स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर लावून जनतेला लुटण्याचे काम नक्कीच करत आहे. देशात महागाई वाढत आहे. पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यातही २० टक्के भेसळ केली जात आहे. जर २० टक्के भेसळ केली नाही तर पेट्रोलचे दर आणखी वाढतील. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने सामान्य लोकांच्या वाहनांचे इंजिन खराब होत आहेत.
भाजपा सरकारच्या काळात सरकारी प्राथमिक शाळा बंद केल्या जात आहेत, मात्र दारूची दुकाने सर्रास उघडली जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, हे असे कोणते साधू-संत आहेत, जे दारूची दुकाने उघडत आहेत? योगीजींना खेळही माहीत नाही आणि खेळणेही माहीत नाही. त्यांना फक्त बुलडोझर चालवणे माहीत आहे आणि तो बुलडोझरही केवळ पीडीए साठीच आहे.



























































