सर्व खासदार एकजुटीने आणि निष्ठेने शिवसेनेसोबत आहेत; संजय राऊत यांनी दिली महत्त्वाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर लोकसभेतील सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व खासदारांची उपस्थिती होती, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. जे खासदार प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. ते ऑनलाईनद्वारे बैठकीला उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले.

याबाबत माहिती देत संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या बैठकीत अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाझे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश आष्टीकर, संजय देशमुख हे खासदार व्हर्चुअली उपस्थित होते. तर संजय बंडू जाधव (परभणी) यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली. सर्व खासदार एकजूट आणि निष्ठेने शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे आहेत. त्यामुळे आता तरी अफवांचा बाजार बंद होईल ही अपेक्षा! असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दर महिन्यात खासदारांची बैठक होते आणि त्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतात. त्याप्रमाणे आजही बैठक बोलवण्यात आली होती. आता पुढील महिन्यातही बैठक होणार आहे. आता ज्यांना प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहता आले नाही, ते पुढील बैठकीला उपस्थित राहतील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.