
जयगड येथील जे.एस.डब्ल्यू. पोर्ट बी-५ मधील कोल शेडवर काम करत असताना ४५ मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१३ जून २०२६) सायंकाळी साडेपाच ते पावणेसातच्या सुमारास घडली. राजूकुमार बालेश्वर सिंह (वय ३७, मूळ रा. सेमरा, अनुग्रह नगर, सिवान, राज्य-बिहार) असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजूकुमार सिंह हे जे.एस.डब्ल्यू. पोर्ट-बी-५ येथील कोलशेडवर जमिनीपासून अंदाजे ४५ मीटर उंचीवर लोखंडी पलिंगचे काम करत होते. सायंकाळी साडेपाच वाजता कामाची वेळ संपल्यानंतर ते इतर कामगारांसह खाली उतरत होते. खाली उतरत असताना त्यांनी अंगाला लावलेल्या ‘सेफ्टी हुक’चा वापर केला होता. मात्र, पुढे चालताना हुक बदलत असताना, ते योग्य ठिकाणी अडकले नाही. याच गडबडीत त्यांचा पाय अचानक फायबरच्या पत्र्यावर पडला. वजनामुळे फायबरचा पत्रा तुटून राजूकुमार थेट ४५ मीटर उंचीवरून खाली कोसळले.
या भीषण अपघातात राजूकुमार यांच्या हाताला, पोटाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली व ते जागीच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद-खंडाळा येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची जयगड पोलीस ठाण्यात ‘आकस्मित मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






























































