पदाचा राजीनामा द्या आणि थेट संघात जा! केरळच्या 3 कुलगुरूंवर काँग्रेस नेते वेणुगोपाल भडकले, नेमकं कारण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केरळमधील तीन विद्यापीठांच्या कुलगुरूंवर सोमवारी जोरदार निशाणा साधला. हे कुलगुरू राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला आरएसएसच्या विचारसरणीशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वेणुगोपाल यांनी केला आहे.

शनिवारी तिरुवनंतपुरम येथे आयोजित करण्यात आलेल्या आरएसएसच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाला केरळ विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ आणि मल्याळम विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित राहिले होते. या संदर्भात अलाप्पुझाचे खासदार असलेल्या वेणुगोपाल यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

केरळचे उच्च शिक्षण क्षेत्र हे नेहमीच शैक्षणिक उत्कृष्टता, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आणि लोकशाही मूल्यांसाठी ओळखले जाते. मात्र, आता ते जाणीवपूर्वक आरएसएसच्या विचारसरणीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यांच्याकडून उच्च शिक्षण क्षेत्राला तटस्थ आणि धर्मनिरपेक्ष मार्गावर नेण्याची अपेक्षा आहे, तेच लोक आरएसएसला त्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी मदत करत आहेत. हे तीन कुलगुरू अजूनही विद्यापीठांच्या प्रमुखपदी असणे ही केरळसाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे, अशी घणाघाती टीका वेणुगोपाल यांनी केली.

या तिन्ही कुलगुरूंनी शैक्षणिक तटस्थतेचा केवळ मुखवटा परिधान करून राहण्यापेक्षा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि उघडपणे आरएसएसमध्ये सामील व्हावे. आरएसएसच्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या व्यक्ती या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व करण्यास पात्र नाहीत, असे म्हणत वेणुगोपाल यांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

आंदोलनाचा इशारा

कुलगुरूंनी स्वतःहून राजीनामा दिला नाही, तर घटनात्मक मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या जनतेकडून त्यांच्याविरोधात तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही वेणुगोपाल यांनी दिला. एका समृद्ध शैक्षणिक वारसा असलेल्या विद्यापीठाचे नेतृत्व करण्यासाठी आरएसएसच्या नेत्यांशी एकनिष्ठ राहणे ही पात्रता नसून; शैक्षणिक उत्कृष्टता, धर्मनिरपेक्ष मूल्ये, लोकशाही आणि संविधानाप्रती निष्ठा असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.