पक्ष फोडणे लोकशाहीसाठी घातक, तृणमूलचे खासदार फुटल्याप्रकरणी केजरीवाल यांची भाजपवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडणे, आमदार-खासदारांना पैशांचे आमिष दाखवणे आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोप त्यांनी केला.

पणजी येथे पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले की, कोलकाता आणि महाराष्ट्रात जे घडले, त्यावरून भाजप हा “अनैतिक आणि मूल्यहीन पक्ष” असल्याचे दिसून येते. लोक एखाद्या पक्षाला मतदान करतात, मात्र नंतर भाजप मोठ्या पैशांच्या जोरावर किंवा ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून लोकप्रतिनिधींना फोडते, असा आरोप त्यांनी केला.

“हे आपल्या लोकशाहीसाठी आणि लोकशाही व्यवस्थेसाठी चांगले नाही. भाजप जे काही करत आहे – राजकीय पक्ष फोडणे, विरोधकांना कमकुवत करणे, ईडीचा आणि पैशांचा गैरवापर करणे – ते अत्यंत धोकादायक आहे. याविरोधात प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे,” असे ते म्हणाले.

पश्चिम बंगालमधील घडामोडींवर भाष्य करताना केजरीवाल म्हणाले की, “जर लोकांनी तृणमूल काँग्रेसवर विश्वास ठेवून त्यांच्या खासदारांना निवडून दिले असेल आणि नंतर त्यांपैकी अनेक खासदारांना दुसऱ्या पक्षात जाण्यास प्रवृत्त केले जात असेल, तर ते चुकीचे आहे.”

यावेळी केजरीवाल यांनी अभिजीत दिपके यांनी स्थापन केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) बाबतही भाष्य केले. या पक्षाबद्दल विचारले असता त्यांनी तो “चांगला पक्ष” असल्याचे म्हटले. शिक्षण क्षेत्रातील कथित अपयश आणि NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी CJP ने केली आहे.