
चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्न मन सुन्न करणाऱ्या एका घटनेने पुन्हा ऐरणीवर आलाय. गावाला जोडणारा रस्ताच नसल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला. बाळाला जन्म दिल्यानंतर तिला वेळेवर उपचारच न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम जिवती तालुक्यातील घोडनकप्पी या आदिवासीबहुल गावात रस्त्याअभावी एका २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संगीता तुळशीराम गेडाम या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. प्रसूती वेदना सुरू होताच कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र गावापर्यंत जाण्यासाठी बारमाही रस्ता नसल्याने डोंगर, दऱ्या आणि पायवाटांचा आधार घ्यावा लागला. रुग्णालय गाठण्याआधीच रस्त्यात त्यांची प्रसूती झाली आणि त्यांनी एका बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म झाल्यानंतर काही वेळातच संगीताची प्रकृती खालावू लागली. प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असतानाही तिला वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. कारण रुग्णवाहिका जिथपर्यंत पोहोचू शकत होती, तिथपर्यंत पोहोचण्यासाठीही डोंगरवाटेचा कठीण प्रवास करावा लागत होता. संगीताचा जीव वाचवण्यासाठी कुटुंबीयांची धडपड सुरू होती. मात्र कठीण परिस्थितीसमोर आणि सुविधांच्या अभावासमोर त्यांची झुंज अपुरी पडली. अखेर उपचाराअभावी संगीताचा मृत्यू झाला. पत्नी गमावल्याचे दुःख व्यक्त करताना तुळशीराम गेडाम यांची आता एकच मागणी आहे – “रस्ता असता तर माझी पत्नी वाचली असती. आम्हाला आता फक्त आश्वासनं नकोत, कायमस्वरूपी रस्ता हवा.”
इथल्या लोकांचा अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. निवेदने दिली, आंदोलने केली, पण प्रश्न कायम आहे. आजारी व्यक्ती असो किंवा गर्भवती महिला, प्रत्येकवेळी जीव धोक्यात घालून डोंगर उतरावा लागतो. मुलीच्या मृत्यूने व्यथित झालेले वडील सांगतात की, “मुलीला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण रस्ता नसल्याने वेळ निघून गेली आणि आम्ही तिला गमावले.
विकासाच्या कितीही बाता होत असल्या, तरी वास्तविकता किती विसंगत आहे, हे या प्रकरणातून दिसून येते. शासन आतातरी झोपेतून जागे होणार का, हा प्रश्न आहे.


























































