
उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. सहा वर्षाच्या मुलीच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले असताना डॉक्टरांनी डाव्या हाताला प्लास्टर केले. याप्रकरणी पालकांनी रुग्णालयाच्या बेजबाबदारपणाविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, महर्षि देवरहा बाबा मेडिकल कॉलेजमध्ये ही संतापजनक घटना घडली. देवरिया येथील रहिवासी अल्पना उपाध्याय यांची सहा वर्षांची मुलगी खेळताना पडली. यात तिच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले. खासगी डॉक्टरच्या सल्ल्याने हाताचा एक्स-रे काढून मुलीला पालकांनी महर्षि देवरहा बाबा मेडिकल कॉलेजमध्ये नेले. तेथे अस्थिरोग तज्ज्ञांनी तिला बाजूच्या रुममध्ये प्लास्टरला जाण्यास सांगितले.
प्लास्टर करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरची पावती आणि एक्स-रे रिपोर्ट पाहिल्यानंतरही मुलीच्या उजव्या हाताऐवजी डाव्या हाताला प्लास्टर केले. रुग्णालयातील या गंभीर प्रकाराबाबत मुलीच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत महिलेने रुग्णालयाचा भोंगळ कारभाराविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवक्ते आणि सीएमएस डॉ. एच. के. मिश्रा यांनी या प्रकरणी एक निवेदन जारी केले. संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. चौकशी अहवालानंतर दोषी कर्मचारी किंवा डॉक्टरवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मिश्रा यांनी सांगितले.


























































