पुण्यात भोंदू बाबाकडून महिलेवर अत्याचार, मूत्र देखील प्यायला लावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार करून तिला मूत्र प्यायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. अध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली एका महिलेचे वर्षानुवर्षे लैंगिक शोषण, शारीरिक छळ आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी भोंदू बाबासह त्याच्या 7 साथीदारांना अटक केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

राधामोहन मिश्रा (वय ५९) असे अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. पुणे गुन्हे शाखेने वाघोली येथील उबळेनगर भागातील एका बंगल्यावर छापा टाकून ही कारवाई केली. हा बंगला आश्रम म्हणून वापरला जात होता. पोलिसांनी मिश्राचा मुख्य साथीदार कंवर नयन (वय ५८) आणि इतर ६ महिला साथीदारांना देखील अटक केली आहे. या सर्व आठ आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

१५ वर्षांहून अधिक काळ छळ आणि अघोरी कृत्य

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एका ४१ वर्षीय महिलेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. ती मूळची हरियाणाची आहे. ती महिला एका नामांकित खाजगी कंपनीत नोकरीला असून, ती गेल्या २० वर्षांपासून या भोंदू बाबाच्या संपर्कात होती. तसेच गेल्या काही वर्षांपासून ती या भोंदूबाबाच्याच बंगल्यात राहत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा अत्यंत अघोरी पद्धतीने शारीरिक आणि मानसिक छळ केला गेला. तिला इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले, तसेच भोंदूबाबाने तिला तिचे मूत्र पिण्याची सक्ती देखील केली होती. हा छळ गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून सुरू होता.

संपत्ती हडपण्याचा प्रयत्न

तक्रारीनुसार, भोंदू बाबाने पीडित महिलेच्या विश्वासाचा फायदा घेऊन तिची मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. काही मालमत्ता आधीच हस्तांतरित करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या प्रकरणात फसवणुकीचेगुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

मूळचा हरियाणाचा असलेला राधामोहन मिश्रा गेल्या ८ वर्षांपासून पुण्यात राहत होता. आपल्याकडे दैवी शक्ती असून आपण आरोग्य, आर्थिक आणि कौटुंबिक समस्या दूर करू शकतो, असा दावा करून तो लोकांना जाळ्यात ओढायचा. याच भोंदूपणाचा गैरफायदा घेऊन त्याने पीडितेला तिच्या कुटुंबापासून वेगळे केले आणि तिच्यावर नियंत्रण मिळवले.

पुणे गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या भोंदू बाबाने आणखी कोणाची फसवणूक किंवा छळ केला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.