NEET Paper Leak – एक कोटींची नुकसानभरपाई द्या! ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या अभिजित दिपकेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास दिल्लीत 20 जूनला आंदोलन करण्याचा इशारा कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) दिला होता. या आंदोलनापूर्वी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

देशातील शैक्षणिक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून परीक्षांच्या दबावामुळे आणि पेपर लीकच्या संकटामुळे गेल्या काही दिवसांत 11 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांनी मोदींना पत्र लिहिले आहे.

गेल्या 48 तासांत 5 विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे. पुनर्रचना परीक्षांच्या वाढत्या मानसिक दबावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठी कर्जे काढली होती. मात्र, पेपर लीक आणि व्यवस्थेच्या अपयशामुळे मुलांचा बळी गेला असून ही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाली आहेत. म्हणूनच, पीडित कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची तातडीची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करून देशातील तरुण व पालकांचा विश्वास पुन्हा संपादन करावा, असे पत्रात म्हटले आहे.