
अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याबाबत उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी, SIT) स्थापन केले आहे. आता एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित पुरावे आहेत, त्यांनी ते तपासणीसाठी SIT समोर सादर करावेत, असे आवाहन उत्तर प्रदेश सरकारने केले आहे. तसेच एसआयटी चौकशीतून सत्य समोर येईल, असा दावा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, मग ती कोणत्याही पदावर असो, सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेली तीन सदस्यांची एसआयटी राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणाची चौकशी करत आहे. ट्रस्टच्या विनंतीवरून आम्ही एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि मी तुम्हाला खात्री देतो की या चौकशीतून पूर्ण सत्य समोर येईल. त्याबद्दल काहीही शंका नाही, असे ते म्हणाले.
देणगीच्या पैशांचा गैरवापर झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मंदिर ट्रस्टने केलेल्या विनंतीनंतर, उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी एसआयटीची स्थापना केली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलेल्या आरोपांनंतर हा तपास सुरू करण्यात आला आहे. अखिलेश यादव यांनी ७ जून रोजी काही अहवालांचा संदर्भ देत दावा केला होता की, मंदिराला मिळालेल्या देणगीतील कोट्यवधी रुपये गायब आहेत आणि या प्रकरणाची दखल न्यायालयाने घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.



























































