अल्लू अर्जुन ‘आरोपी क्रमांक 11’, न्यायालयाने बजावले समन्स; 22 जूनला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. हैदराबादमधील प्रसिद्ध संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात नामपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुनला समन्स बजावले आहे. आगामी सोमवारी (22 जून) रोजी न्यायालयाने त्याला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण 23 जणांना आरोपी केले आहे. यात अल्लू अर्जुनचा आरोपी क्रमांक 11 म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे संध्या थिएटरच्या व्यवस्थापनातील सदस्यांना आरोपी क्रमांक 1 ते 10 करण्यात आले आहे. या प्रकरणी आता न्यायालयाने अल्लू अर्जुनसह एकूण 19 आरोपींना समन्स जारी केले आहे.

न्यायालयाच्या आदेशाचा आदर

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अल्लू अर्जुनच्या लिगल टीमने प्रतिक्रिया दिली आहे. नामपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुनला सोमवारी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो आणि या प्रकरणा संदर्भातील अधिक सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध करू, असे त्यांच्या टीमकडून सांगण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

4 डिसेंबर 2024 रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनच्या बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोदरम्यान अल्लु अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी अनियंत्रित झाल्याने तिथे चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत रेवती नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा मुलगा श्री तेजा हा गंभीर जखमी झाला होता.