शिक्षणाला प्रॉडक्ट बनवलं… पेपरफुटीच्या मुद्द्यावरून कन्हैया कुमार यांची केंद्र सरकारवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी शुक्रवारी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “चिट्ठ्या वाचून बोलणाऱ्या पंतप्रधानांच्या राज्यात शिक्षणाला एक प्रॉडक्ट बनवले आहे,” असा घणाघात त्यांनी केला. देशातील उच्च पदांवर बसलेल्या अयोग्य लोकांमुळे आणि मोदी सरकारच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे आज शिक्षण कोणासाठीही सोपे राहिलेले नाही, असे ते म्हणाले. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते असे म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत कन्हैया कुमार म्हणाले की, मोदींनी आम्ही हार्वर्ड वाले नाही, तर हार्डवर्क वाले आहोत, असा जुमला दिला होता. पण त्यांचे हेच हार्डवर्क आहे की, सतत पेपर फुटत आहेत. जे सरकार मतं चोरी करेल, ते सरकार पेपरही चोरेल, अशी बोचरी टीका त्यांनी केली. ज्यांना शिक्षणातील ई सुद्धा माहीत नाही असे लोक सरकारमध्ये बसले आहेत, ते अशीच पोकळ विधाने करणार आणि टेलिग्रामवर बंदी घालणार.

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त करत कन्हैया कुमार यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर बंदी घालण्याची मागणी केली. परीक्षा पे चर्चा करणारे पंतप्रधान मोदी पेपरफुटीवर मात्र एक चकार शब्दही बोलत नाहीत. आज अशी एकही परीक्षा उरली नाही जिचा पेपर फुटत नाहीये. आता तर यूपीएससी सारख्या परीक्षांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्वांमागे सरकारमधील लोकांचा नाकर्तेपणा कारणीभूत असून सरकारच्या गांभीर्याअभावी शिक्षणव्यवस्थेचा एक विनोद बनून राहिला आहे.