अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार; निष्ठावंत खासदार राजाभाऊ वाजे यांचे जल्लोषात स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोट्यवधी रुपयांचा विकास निधी देण्याची ऑफर धुडकावून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले खासदार राजाभाऊ वाजे यांचे शुक्रवारी शिवसैनिकांनी नाशिक येथे जल्लोषात स्वागत केले.

शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सहा खासदारांनी गद्दारी केली. कोट्यवधी रुपयांचा विकास निधी देण्याची ऑफर एकनाथ शिंदे गटाने नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना एप्रिलमध्ये दिली होती. अखेरपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याची भूमिका घेत वाजे यांनी ही ऑफर ठोकरली. शिवसेना पक्षाच्या दिल्लीतील बैठकीनंतर शुक्रवारी सकाळी त्यांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या शेकडो शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो’, ‘राजाभाऊ वाजे आगे बढो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ‘शिवसेनेचा निष्ठावंत वाघ राजाभाऊ’ अशा घोषणा देत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

या वेळी खासदार भास्कर भगरे, उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, डी. जी. सूर्यवंशी, जिल्हा संघटक केशव पोरजे, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील, नगरसेविका भारती ताजनपुरे, अस्लम मणियार, योगेश गाडेकर, योगेश भोर, वैशाली दाणी, मंगला आढाव, संजिवनी हांडोरे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने हजर होते.

हा निष्ठेचा आनंदोत्सव

‘‘हे स्वागत म्हणजे असंख्य शिवसैनिकांच्या निष्ठेचा जल्लोष आहे. मी जी भूमिका घेतली त्याचा मला अभिमान आहे. मला खासदार करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या कार्यकर्त्यांच्या व पक्षाच्या विश्वासाला मी पात्र ठरलो. शेवटच्या श्वासापर्यंत मी शिवसेनेतच राहीन,’’ असे ठामपणे खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्पष्ट केले. ‘‘माझा मुलगा राजाभाऊ याने पक्षाशी असलेल्या निष्ठsचा आणि प्रामाणिकपणाचा झेंडा दिल्लीत फडकवला याचा मला अभिमान आहे. पक्षाने आमदार, खासदार केले, आता आमची अधिक अपेक्षा नाही, आम्ही समाधानी आहोत,’’ अशी भावना राजाभाऊ यांचे वडील प्रकाशभाऊ वाजे यांनी व्यक्त केली.