
ट्रेनमध्ये चढण्याच्या किरकोळ वादातून दोन प्रवाशांनी एकमेकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील शाहदरा रेल्वे स्थानकावर घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पंकज धामा (उत्तर प्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शाहदरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर शनिवारी सकाळी 6 च्या सुमारास घडली. हरिद्वारला जाणारी ‘योगा एक्सप्रेस’ प्लॅटफॉर्मवर येताच जनरल डब्यात चढण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि ढकलाढकली सुरू झाली. या दरम्यान पंकज धामा यांचा काही सहप्रवाशांशी वाद झाला. या किरकोळ वादाने काही वेळातच हिंसक वळण घेतले. संतापलेल्या जमावाने पंकज यांना ट्रेनच्या गेटजवळून खाली पाडले आणि जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. त्यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाचा (RPF) एक कॉन्स्टेबल पंकज यांना गर्दीतून सोडवताना दिसत आहे. मात्र, गर्दीतून बाहेर काढल्यानंतर पंकज यांना प्लॅटफॉर्मवर तसेच ठेवून तो जवान निघून गेला. गंभीर मारहाणीमुळे जखमी झालेले पंकज हे विव्हळत होते. पण तरीही त्यांच्या मदतीसाठी कोणीही धावले नाही. प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने जखमी प्रवाशाला तत्काळ रुग्णालयात नेले नाही. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळेच पंकज यांचा जीव गेल्याचा आरोप आता केला जात आहे.
#Delhi: शाहदरा रेलवे स्टेशन पर ट्रेन में चढ़ने के दौरान हुए विवाद ने एक यात्री की जान ले ली। प्लेटफॉर्म नंबर-3 पर योगा एक्सप्रेस में सवार होने की कोशिश कर रहे एक युवक के साथ यात्रियों ने कथित तौर पर जमकर मारपीट की। गंभीर हालत में अस्पताल ले जाया गया, मौत।pic.twitter.com/FMTtKLFKuO
— NBT Dilli (@NBTDilli) June 20, 2026
घटनेची माहिती मिळताच दिल्ली रेल्वे पोलीस स्टेशनचे (PS ODRS) पथक घटनास्थळी दाखल झाले. नवी दिल्ली रेल्वेचे डीसीपी सचिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर अवस्थेत असलेल्या पंकज यांना जीटीबी (GTB) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बेदम मारहाणीमुळे पंकज यांच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली होती, असे वैद्यकीय अहवलातून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत नवीन कायदा ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या कलम 105 (सदोष मनुष्यवध) आणि कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे मारहाण करणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.





























































