
वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा फोटो काढत असताना तोल जाऊन ४०० फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अग्रवाल (वय २६, रा. गहुंजे, पुणे) असे या मृत तरुणाचे नाव आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात त्याचे लग्न होणार होते. मात्र लग्नाच्या अवघ्या काही महिने आधीच ही धक्कादायक घटना घडल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हा त्याच्या कुटुंबाच्या रिअल इस्टेट व्यवसायात संचालक होता. गुरुवारी तो आपली होणारी पत्नी आणि दोन मित्रांसोबत मावळ तालुक्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. त्याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही ट्रिप आखण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १०:३० च्या सुमारास किल्ल्याच्या कड्यावर उभे राहून केतन फोटो काढत होता. त्याचवेळी सोसाट्याचा वारा आल्याने त्याचा तोल गेला आणि पाय घसरून तो थेट ४०० फूट खोल दरीत कोसळला. त्याची होणारी पत्नी आणि मित्रांच्या डोळ्यादेखतच ही भीषण दुर्घटना घडली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि शिवदुर्ग मित्र आपत्कालीन बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दाट झाडी यामुळे बचावकार्यात अडथळे आले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.





























































