अमित शहांच्या सभेत संयुक्त महाराष्ट्रची मागणी करणाऱ्या मराठी भाषिक सीमाबांधवांना बाहेर काढले, शेतकऱ्यांनाही दिवसभर नजरकैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे व्यासपीठावर देशाचे कणखर केंद्रीय गृहमंत्री, अशी बिरुदावली मिरवून घेतल्यानंतर, अमित शहा हे येथील जाहीर सभेत ‘या देशातील घुसखोरांना वेचून-वेचून बाहेर काढू’, तसेच ‘या देशात जन्मलेला येथेच राहणार’ असे वक्तव्य करत होते. त्याच वेळी याच सभेत बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत, गेली ७० वर्षे रखडलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी लक्ष वेधणाऱ्या मराठी भाषिकांचा आवाज दडपण्यात आला. पोलिसांनी त्यांना अक्षरशः बाहेर काढले. सभेच्या बाहेरसुद्धा थांबलेल्या या मराठी भाषिकांना धक्काबुक्की करत ताब्यात घेण्यात आल्याने, काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. व्यासपीठावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या एकाही मंत्री, आमदार किंवा खासदाराकडून या मराठी भाषिकांची कसलीही दखल घेण्यात आली नाही.

दरम्यान, अमित शहा यांच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी शक्तिपीठ महामार्ग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली येथील शेतकरी नेत्यांना सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यास केंद्र सरकारकडून सुमारे १ हजार ५०० कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल, आज महायुतीकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘धन्यवाद सभेचे’ आयोजन करण्यात आले होते. यासाठी मध्यरात्री अमित शहा कोल्हापुरात दाखल झाले. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून विमानतळ आणि कार्यक्रमस्थळ मार्गावरील शेकडो छोटी-मोठी दुकाने बंद करण्यात आली होती. शिवाय, वाहतूक कोंडीमुळे संपूर्ण कोल्हापूरकरांनाही वेठीस धरण्यात आले होते. सकाळी श्री अंबाबाई मंदिरात कार्यक्रम झाल्यानंतर, पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ‘जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यापासून ते कणखर केंद्रीय गृहमंत्री’ अशी अनेक स्तुतिसुमने उधळण्यात आली.

यावेळी बोलताना अमित शहा यांनी देशभरात बहुतांश राज्यांत भाजप व मित्रपक्षांची सत्ता असून, बंगालमध्येही आशीर्वाद मिळाला आहे, असे नमूद केले. त्यामुळे ‘आता देशातील एक-एक घुसखोर शोधून काढू, तसेच घुसखोरांचा व्होटबँक म्हणून वापर करू देणार नाही,’ असा इशारा देत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ‘या देशात जन्मलेला येथेच राहणार’ असे प्रवचन झोडत असतानाच, याच वेळी ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत सीमाभागातील मराठी भाषिकांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण कडक पोलीस बंदोबस्तात या मराठी भाषिकांना भरसभेतून बाहेर काढण्यात आले. सभेच्या बाहेर, दूर अंतरावरही त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांशी धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. पण सीमाभागातून आलेल्या या मराठी भाषिकांची कसलीही दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी कोणीही घेतली नाही. सायंकाळी उशिरापर्यंत या सर्व मराठी भाषिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि मराठी भाषिक सीमाबांधव आज सकाळी कोल्हापूरला येत असताना, हत्तरगी येथे कर्नाटक पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी मराठी भाषिकांनी महामार्गावर ठिय्या मांडला. ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे… बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत त्यांनी आंदोलन केले. यावेळी एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे यांच्यासह सर्वांना कर्नाटक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. तर यातून निसटलेल्या मराठी भाषिकांनी अमित शहा यांची भेट घडवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनीही भेट घालून देतो असे सांगून, केवळ आश्वासन दिले. त्यामुळे हे सीमाबांधव‌ आपल्या वेदनेकडे लक्ष वेधण्यासाठी सभेच्या ठिकाणी आले होते. पण येथेही त्यांची घोर निराशा झाली. येथे एकीकरण समितीचे नेते मालोजी अष्टेकर यांच्यासह मराठी भाषिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.