ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर राजीनामा देणार? १०० हून अधिक खासदारांचा वाढता दबाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला आहे. सत्ताधारी लेबर पार्टीच्या १०० हून अधिक खासदारांनी स्टार्मर यांच्या नेतृत्वावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना तातडीने पद सोडण्याची मागणी केली आहे. ‘द ऑब्झर्व्हर’ या ब्रिटिश वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पक्षांतर्गत वाढत्या विरोधामुळे स्टार्मर लवकरच त्यांच्या राजीनाम्याची किंवा पद सोडण्याच्या निश्चित तारखेची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे.

स्टार्मर यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेमुळे आता लेबर पार्टीच्या नव्या नेतृत्वासाठी अँडी बर्नहॅम यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. ५६ वर्षीय बर्नहॅम यांनी नुकतीच संसदेची एक महत्त्वाची जागा जिंकली असून, आता ते पक्षाच्या नेतृत्वाला अधिकृतपणे आव्हान देण्याच्या मजबूत स्थितीत पोहोचले आहेत. या विजयानंतर त्यांनी देशाला नवी दिशा देण्याचे आश्वासनही दिले आहे. बर्नहॅम यांच्याव्यतिरिक्त माजी आरोग्य मंत्री वेस स्ट्रीटिंग यांनीही गरज पडल्यास आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

विशेष म्हणजे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कीर स्टार्मर यांनी लेबर पार्टीला घसघशीत विजय मिळवून दिला होता. मात्र सत्तेत आल्यानंतर उघडकीस आलेले काही वाद, घोटाळे आणि सरकारच्या धोरणांमध्ये वारंवार झालेल्या बदलांमुळे त्यांची लोकप्रियता वेगाने घसरली. अर्थव्यवस्था सुधारणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे ही जनतेला दिलेली मुख्य आश्वासने पूर्ण करण्यात स्टार्मर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सध्या होत आहे.