…तर मुंबईवर पाणीकपातीची वेळ आली नसती; आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सातत्याने पर्यावरण रक्षणाबाबत आवाज उठवत आहे. राज्य सरकार पर्यावरणाचा विनाश करत आहे, त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता त्यांनी राज्य सरकारचे लक्ष मनोरीतील डिसॅलिनेशन प्लांटकडे वेधले आहे. महाविकास आघाडीचा हा प्रकल्प बेकायदा मिंधे सरकराने रद्द केला नसता, तर आज मुंबईकरांवर पाणी कपातीची वेळ आली नसती, असे त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारला एक नम्र आठवण करून देत आहे. आम्ही सुरू केलेला मनोरी येथील ‘समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प’ (डिसॅलिनेशन प्लांट) जर त्यांनी रद्द केला नसता, तर आज मुंबईवर पाणीकपातीची वेळ आली नसती. मिंधे यांच्या बेकायदेशीर सरकारने आमचा प्रकल्प रद्द केला, तर दुसरीकडे भाजपच्या नवीन सरकारने ‘गार्गाई धरणा’ला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे केवळ वन्यजीव अभयारण्यातील ५,००,००० हून अधिक झाडांची कत्तल तर होणार आहेच. शिवाय मुंबई शहराला पावसावरच अवलंबून राहावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

एकीकडे महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना, सत्ताधाऱ्यांना राज्यकारभाराचा विसर पडला आहे. ते केवळ खासदारांची खरेदी-विक्री करण्याच्या घाणेरड्या राजकारणात आणि लोकशाही संपवल्याच्या अहंकाराच्या नशेत मग्न आहेत, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.