झारखंडच्या खूंटीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, PLFI चा कमांडर जखमी, अनेक शस्त्रे जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडमधील खूंटी जिल्ह्यात पोलीस आणि पिपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया (PLFI) या नक्षलवादी संघटनेमध्ये मोठी चकमक उडाली आहे. या चकमकीत पीएलएफआयचा कट्टर नक्षलवादी कमांडर श्रवण दास हा जखमी झाला आहे. या परिसरात काही नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खूंटी जिल्ह्यातील एका जंगलात पीएलएफआयचे काही सदस्य एकत्र आल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने या परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दल जवळ येत असल्याची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी काही काळ चाललेल्या या जोरदार गोळीबारात नक्षलवादी श्रवण दास याला गोळी लागली आणि तो जखमी झाला.

या चकमकीदरम्यान घनदाट जंगलाचा फायदा घेत इतर काही नक्षलवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. जखमी श्रवण दास याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी काही शस्त्रे आणि नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त केले आहे. पळून गेलेल्या इतर नक्षलवाद्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.