राज्यात पाणीटंचाईचे संकट, सत्ताधारी फोडाफोडीत व्यस्त; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ऑपरेशन टायगर’च्या नावाखाली खासदारांना खरेदी करण्याच्या भाजप-शिंदे गटाच्या कारस्थानावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी घणाघाती हल्ला चढवला. एकीकडे महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. असे असताना सत्तेतील पक्षांना चांगल्या पद्धतीने राज्यकारभार करण्याचा विसर पडला असून ते केवळ खासदार खरेदी करण्याच्या घाणेरड्या राजकारणात आणि लोकशाही संपवल्याच्या अहंकाराच्या नशेत मग्न आहेत, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबईतील पाणीकपात तसेच राज्याच्या ग्रामीण भागांतील पिण्याच्या पाण्याची टंचाई या संकटाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेचा समाचार घेतला. आम्ही सुरू केलेला मनोरी येथील ‘समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प’ (डिसॅलिनेशन प्लांट) जर त्यांनी (मिंधे) रद्द केला नसता तर आज मुंबईवर पाणीकपातीची वेळ आली नसती. मिंधे यांच्या बेकायदेशीर सरकारने आमचा प्रकल्प रद्द केला, तर दुसरीकडे भाजपच्या नवीन सरकारने ‘गारगाई धरणा’ला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे केवळ वन्यजीव अभयारण्यातील पाच लाखांहून अधिक झाडांची कत्तलच होणार नाही, तर मुंबईला पावसावरच अवलंबून राहावे लागेल, अशी चिंता आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे व्यक्त केली.