अमोनिया गळतीने सात महिलांचा मृत्यू; तामीळनाडूच्या सी फूड निर्यात कारखान्यातील दुर्घटना, अनेकांची प्रकृती गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडूमधील तिरुवल्लूर जिल्ह्यातील एका कारखान्यात रविवारी अमोनिया वायूची गळती होऊन तब्बल सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 70 हून अधिक जणांची प्रकृती बिघडली. त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वायुगळतीमुळे  तामीळनाडूमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

वायुगळती सेंट पीटर्स पॉल सी फूड्स एक्सपोर्ट युनिटमध्ये झाली.  दुर्घटना घडली तेव्हा कारखान्यात 100 हून अधिक कर्मचारी होते. त्यातून कित्येक जणांची प्रकृती एकाचवेळी बिघडली. उर्वरित कर्मचारी घाबरून कारखान्याच्या बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफची टीम यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चौकशीचे आदेश

या कारखान्यात कोळंबीवर प्रक्रिया करण्याचे काम केले जात होते. तामीळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. तसेच समितीला 24 तासांत अंतरिम अहवाल आणि पुढील तीन दिवसांत अंतिम अहवाल देण्याची सूचना देण्यात आली आहे.

नऊ रुग्णांना चेन्नईला पाठवण्यात आले

जिल्हाधिकारी एस. कविता यांनी सांगितले की, 46 रुग्णांना वेल्स रुग्णालयात आणि 21 रुग्णांना व्यंकटेश्वरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर अवस्थेतील नऊ रुग्णांना चांगल्या उपचारांसाठी रुग्णवाहिकेने चेन्नई येथील शासकीय स्टॅनले मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. बळी पडलेल्यांपैकी बहुतेक 24 ते 25 वयोगटातील तरुण महिला होत्या. रुग्णांच्या नाडी आणि रक्तदाबावर लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकांचा रक्तदाब कमी असला तरी त्यांचे तरुण वय पाहता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा अपेक्षित होती.