उन्हाच्या झळांनी कासावीस कावळ्याला ‘आइस्क्रीम’चा मोह! थंडाव्यासाठी माणसांबरोबरच पक्ष्यांचाही संघर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोणावळा म्हटले की डोळ्यांसमोर उभी राहते ती धुक्याची चादर, हिरवा निसर्ग आणि थंड वाऱ्याची झुळूक. मात्र, यंदाच्या प्रखर उन्हाळ्याने या थंड हवेच्या ठिकाणालाही होरपळून काढले आहे. त्यामुळे माणसेच नव्हे, तर पक्षी आणि प्राण्यांनाही जीवाची काहिली कमी करण्यासाठी थंडाव्याचा आधार शोधावा लागत आहे. याच वास्तवाचे एक बोलके हृदयस्पर्शी आणि विचार करायला लावणारे छायाचित्र नुकतेच समोर आले आहे.

भर दुपारची वेळ. हॉटेलमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी. टेबलांवर आइस्क्रीमचे कप आणि थंड पेयांचा आस्वाद घेणारे लोक. अशात अचानक एक कावळा उडत थेट हॉ टेलमध्ये येतो. गर्दीची, माणसांची किंवा गोंगाटाची कोणतीही पर्वा न करता तो एका खोल कपातील आइस्क्रीम चोचीत घेऊन निवांतपणे खाऊ लागतो. हा क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त झाला आणि त्याने अनेकांच्या मनाला चटका लावला.

ही घटना एक गंभीर संदेश देऊन जाते. आपण वाढवलेले काँक्रीटचे जंगल, कमी होत चाललेली झाडे, आटत चाललेले पाणवठे आणि वाढते तापमान याचा सर्वाधिक फटका मुक्या जीवांना बसत आहे. माणसांकडे पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रणा आहेत; पण पक्षी आणि प्राण्यांकडे काय? त्यांच्यासाठी पाण्याचा एक कटोरा आणि सावलीचे एखादे झाड हाच जगण्याचा आधार आहे.

लोणावळ्यातील त्या कावळ्याने आइस्क्रीमचा घेतलेला घास हा केवळ थंडाव्याचा शोध नव्हता, तर तो निसर्गाने माणसाला दिलेला एक निःशब्द इशारा होता. उन्हाचे चटके सर्वांनाच बसतात; फरक इतकाच की, माणूस बोलू शकतो आणि मुक्या जीवांची व्यथा त्यांच्या अशाच एखाद्या कृतीतून समोर येते.