
रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने मोटरसायकलचालकाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. राज पतंगे असे या तरुणाचे नाव आहे. संतापजनक म्हणजे अपघात झाल्यानंतर मदत करण्याऐवजी डंपरचा चालक पंकज मिस्त्री हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पंकज मिस्त्री हा डंपर घेऊन रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीतून जात होता. घाटातील रस्ता वळणाचा असूनही तो बेदरकारपणे डंपर चालवत होता. त्याचवेळी नागोठण्याहून रोह्याकडे जाणाऱ्या राज पतंगे या तरुणाच्या मोटरसायकलला डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, पतंगे हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर जखमीला मदत न करता डंपरचालक पळून गेल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
























































