आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा मुहूर्त ठरला; वेळापत्रक जाहीर, १५ जुलैच्या पहाटे नवी मुंबईतून पहिले विमान अबुधाबीकडे झेपावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी एअर इंडिया एक्सप्रेसचे पहिले विमान अबुधाबीच्या दिशेने झेप घेणार आहे. या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे वेळापत्रक कंपनीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या पहिल्या विमानातून प्रवास करण्यासाठी नवी मुंबई आणि परिसरातील अनेक होशी नागरिकांनी बुकिंग करण्यास सुरुवातही केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या माध्यमातून सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस नवी मुंबई ते अबुधाबी ही विमानसेवा चालवण्यात येणार असून नंतर प्रवाशांच्या मागणीनुसार विमानसेवेत वाढ होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑगस्ट २०२५ रोजी होणार असून त्यानंतर देशांतर्गत विमानसेवा २५ डिसेंबर २०२५ रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची तयारी व्यवस्थापनाने केली होती. उद्घाटनानंतर तब्बल सहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावरून अबुधाबीच्या दिशेने उड्डाण करणार आहे. हे विमान स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी अबुधाबीच्या विमानतळावर लँडिंग करणार आहे.

एनएमआयएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची घोषणा

एनएमआयएएलचे (नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) मुख्य कार्यकारी अधिकारी बी. जे. के. शर्मा यांनी नुकतीच १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या आंतरराष्ट्रीय विमानसेवेकडे प्रवाशांचे लक्ष लागले होते.

एअर इंडिया एक्सप्रेसची सेवा

एअर इंडिया एक्सप्रेसच्या माध्यमातून १५ जुलैपासून आठवड्यातून दोन दिवस गुरुवार आणि शुक्रवार नवी मुंबई ते अबुधाबी ही विमानसेवा चालवली जाणार आहे. २१ जुलैपासून रविवारीही विमानसेवा या मार्गावर उपलब्ध होणार आहे.

नवी मुंबई ते अबुधाबी या नॉनस्टॉप प्रवासाचा कालावधी ३ तास १० मिनिटे असणार आहे.
नवी मुंबई ते अबुधाबी परतीच्या प्रवासासाठीचे तिकीट सध्या १२ हजार ५५० रुपयांपासून उपलब्ध आहे.