
ठाणे जिल्ह्यासह ठाणे शहरात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे. वागळे, कळवा, मुंब्रा, दिवासह घोडबंदर येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन वेळा पत्र देऊनदेखील ठाणेकरांच्या पाण्यासाठी पालकमंत्र्यांनी साधी एक बैठकही घ्यायला वेळ नाही, असा आरोप भाजप आमदार संजय केळकर यांनी आज केला. ठाणे शहरात पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून आतातरी जागे व्हा, असा सल्ला केळकर यांनी दिला.
ठाणे शहरातील पाणी समस्येसंदर्भात आज भाजपने एका पत्रकार परिषदचे आयोजन केले. यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माधवी नाईक आदी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या तिन्ही आमदारांनी महापालिका प्रशासन आणि शिंदे गटाच्या कारभाराची चिरफाड केली. पालकमंत्री शिंदे यांना मार्च आणि मे महिन्यात पत्र दिले. मात्र बैठकीसाठी पालकमंत्र्यांनी वेळ दिला नाही याची खंत केळकर यांनी व्यक्त केली.
ठाणे शहरात उंचच उंच टॉवर उभे राहत आहेत. पण त्यांना पाणी कुठून देणार, टँकरमाफियांना रोख कोण लावणार, असा सवाल यावेळी भाजपने उपस्थित केला. उच्चभ्रू गृहसंकुलांना पाण्यासाठी हातपाय जोडावे लागत असून वर्षाला दीड कोटींपर्यंत पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याचे केळकर यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याची व्यवस्था करा नाहीतर शहरातील बांधकामे थांबवा, असा इशारा केळकर यांनी दिला आहे.
श्वेतपत्रिका काढा, ठाणेकरांना हिशोब द्या!
केंद्र, राज्य सरकारकडून अमृत योजनेच्या माध्यमातून ठाणे पालिकेला तब्बल १ हजार ८११ कोटी रुपयांचा निधी मिळाला. मात्र हा निधी नेमका कुठे मुरला, याचा हिशोब द्यावा. मागील दहा वर्षांत पाण्यासाठी किती निधी आला याची श्वेतपत्रिका काढा, ठाणेकरांना हिशोब द्या, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे. ठाण्याच्या या पाणी प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचेदेखील केळकर यांनी यावेळी सांगितले.
पालिकेचे हक्काचे स्वतःचे धरण नसल्याने दरवर्षी निर्माण होणारी ही समस्या यंदाही कायम असून पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
ठाणे महापालिका हद्दीत मीटर नाही, पाण्याचे नियोजन नाही. नियोजनशून्य कारभार सुरू आहे.
सध्या शहरातील विविध भागांत सरासरी ७५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. घोडबंदर, दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरात ही समस्या अधिक तीव्र झाली आहे.
























































