
धूम स्टाईल कारच्या वेगाने एका उमदा फुटबॉलपटूचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना आज पहाटे मुंबई-वडोदा महामार्गावर एरंजाड गावाजवळ घडली. बदलापूर येथील योगेश नेगी (२६) या एअरटेल कर्मचारीचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्यासोबत त्याची मैत्रीण रिवेका जेकब (२४) हिचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर कारमालक अंगद गिल (२५) गंभीर जखमी आहे. अपघातानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये या कारचा वेग तब्बल ताशी २५१ किलोमीटर असल्याचा दावा करण्यात येत आहे.
बदलापूरात शोककळा
वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या तीन मित्रांच्या प्रवासाचा शेवट अशा दुर्दैवी दुर्घटनेत झाल्याने बदलापूरसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. जखमी अंगद गिल याच्यावर कल्याण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
योगेश नेगीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिघे मित्र-मैत्रीण एकत्र आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते शनिवारी मध्यरात्रीनंतर बदलापूरच्या दिशेने निघाले होते. पहाटेच्या सुमारास मुंबई-वडोदा राष्ट्रीय महामार्गावरील एरंजाडजवळ कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनाचे इंजिन, चाके आणि इतर भाग मोठ्या परिसरात फेकले गेले.
दरम्यान, या अपघातानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये कारचा वेग तब्बल ताशी २५१ किलोमीटर असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडीओ अपघातापूर्वीचा असल्याचे सांगितले जात असल्याने अतिवेग हे अपघातामागील प्रमुख कारण असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.





























































