वीज गेल्याने मॉलच्या लिफ्टमध्ये 13 जण अडकले, 35 मिनिटांनी सुटका; मुलगी बेशुद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज गेल्यामुळे मॉलमधील लिफ्टमध्ये 13 जण अडकल्याची घटना उत्तर प्रदेशातील बरेलीत घडली. श्वास गुदरमल्यामुळे एक किशोरवयीन मुलगी बेशुद्ध पडली. सुमारे 35 मिनिटे सर्वजण अडकून पडले होते. बरेलीच्या सिव्हिल लाइन्स भागातील ‘सिटी सेंटर एलए मॉल’मध्ये रविवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्ये अडकले. घटनेवेळी लिफ्टमध्ये तीन मुले आणि चार महिलांसह एकूण 13 जण होते. लिफ्ट बंद पडल्यानंतर अडकलेल्या नागरिकांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. लिफ्टमध्ये दिलेल्या आपत्कालीन क्रमांकाद्वारे मॉलच्या सुरक्षा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रसंगात 17 वर्षीय शालिनी घाबरल्यामुळे बेशुद्ध पडली. त्यानंतर लिफ्टमधील काही लोकांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. बाहेर असलेले लोक आणि मॉलचे कर्मचारीही बचाव कार्यात सहभागी झाले.

अर्ध्या तासाहून अधिक काळानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून उघडण्यात आला आणि आत अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. बेशुद्ध मुलीला बाहेर काढण्यात आले. आता तिची प्रकृती स्थिर करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लिफ्ट अडकल्याची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. जनरेटर सुरू केला जात असतानाच लिफ्टमधील कोणीतरी दरवाजावर लाथ मारली, ज्यामुळे लिफ्टचा सेन्सर बंद पडला, असे मॉल व्यवस्थापनाने पोलिसांना सांगितले.