मिंधे गटात गेल्यामुळे गद्दारांना ठेकेदारीचा निधी मिळणार, 25 टक्के थेट घरात जाणार; संजय राऊत यांनी सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधात असल्यामुळे आम्हाला निधी मिळत नाही, मतदारसंघात विकासकामे होत नाहीत, साथा ट्रान्सफार्मर देऊ शकत नाही, अशी कारणे सांगून गद्दारीची झूल पांघरलेले सहाही खासदार चक्क त्यांना मतदान करणाऱ्या मतदारांचीच दिशाभूल करत आहेत. कारण विकासकामांसाठी दोन वर्षांत या खासदारांना जो निधी मिळाला तोदेखील या गद्दारांनी वापरला नसल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी समोर येताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गद्दारांची सालटी काढली.

मंगळवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल नाशिक विधान परिषद निवडणुकीत मिंधे गटाचा पराभव झाला. भाजपची सर्व मते गोकुळ गीते यांना पडली. पण पुढल्या दोन तासांमध्ये मिंध्यांनी गोकुळ गीते यांना विकत घेऊन आपल्या पक्षात आणले. ‘पैसा फेको, तमाशा देखो’चे राजकारण महाराष्ट्रात चालले आहे.

काल झाकलेले पुतळे उघडतात तसे झाकलेल्या गद्दारांचे पुतळे मिंध्यांने उघडले आणि दाखवले हे सहा गद्दार आहेत. आम्ही त्यांचा मान-सन्मान ठेवू, असे मिंधे यावेळी म्हणाले. याचा समाचार घेत संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेमध्ये मान-सन्मान नव्हता का? शिवसेनेत अधिक मान-सन्मान, स्वाभिमान होता. पण आता हे मान-सन्मान ठेवणार म्हणजे काय करणार? यांचा मान-सन्मान हा 50 कोटी, 75 कोटी आहे. त्याला ते मान सन्मान समजतात.

निधीसाठी गेलो म्हणणाऱ्यांचे आकडे समोर आले आहेत. मतदारसंघासाठी जो निधी दिला होता तो धड वापरू शकले नाहीत. 15-16 कोटींचा निधी पडून आहे. हा विकास कामांचा निधी आहे. मग आता जे आकडे समोर आले आहेत तो निधी का वापरला गेला नाही? तुमच्या भागात विकासासाठी हा निधी वापरला नाही. आता कोणत्या निधीसाठी, विकासासाठी गेला? असा सवालही राऊत यांनी केला.

मिंध्यांचे पालनपोषणही ‘मातोश्री’च्या पाळणाघरातच झालंय, बाळासाहेबांच्या वक्तव्याची खिल्ली उडवणाऱ्यांचा संजय राऊतांनी घेतला समाचार

एका खासदाराचा 16 कोटींचा निधी शिल्लक आहे. एकाने शिर्डीमध्ये 5-25 लाख खर्च केलेत. आता नवीन गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार. निधी म्हणून 200-300 कोटींची कामे मिळणार आणि त्यातले 25 टक्के थेट तुमच्या घरात जाणार. हा त्यांचा मान सन्मान. ठेकेदारीतील कमीशन आणि किटबॅग मिळणे हा त्यांचा मान सन्मान. राज्यातील किंवा त्यांच्या मतदारसंघातील जनता खुळी नाही. गद्दारांचा मान सन्मान जरूर राखा, पण मतदारसंघातील जनता त्यांना माफ करणार नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.