बंगळुरूमध्ये क्षुल्लक वादातून पीजी मालकाची हत्या; दोन महाविद्यालयीन विद्यार्थी अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात होऊन एका पेइंग गेस्ट (पीजी) मालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. मृत व्यक्तीची ओळख माधव माटले (वय 37) अशी झाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कस्तुरीनगर मुख्य रस्त्याजवळील त्यांच्या पीजीसमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश आणि डॉन ब्राईट सन हे दोघे पीजीच्या आवारात नळाच्या पाण्याने पाय धूत होते. यावर पीजी मालक माधव माटले यांनी आक्षेप घेतल्याने त्यांच्यात वाद झाला. आरोपी हे मित्र असून ते संबंधित पीजीमध्ये राहत नव्हते. तसेच, घटनेच्या वेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आहे. असे वृत्त पीटीआय ने दिले आहे.

वाद वाढल्यानंतर माटले हे त्या मुलांना धडा शिकवण्यासाठी क्रिकेटची बॅट घेऊन आले. मात्र, आरोपींनी ती बॅट हिसकावून घेतल्याचा आरोप असून त्याच बॅटने त्यांनी माटले यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या माटले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी राममूर्ती नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या राकेश हा बीकॉमच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.