
हिंदुस्थानने पाकिस्तानवर एफआयएच पुरुष प्रो लीग स्पर्धेत 4-3 गोल फरकाने थरारक विजय मिळविला. पहिल्या सत्रामध्ये खेळाच्या प्रवाहाविरुद्ध पाकिस्तानने आघाडी घेत हिंदुस्थानी चाहत्यांना धक्का दिला. पेनल्टी कॉर्नरवर अहमद नदीम याने अचूक फटका मारत पाकिस्तानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
मात्र हिंदुस्थानी संघाने दुसऱया सत्रामध्ये दमदार पुनरागमन केले. अभिषेक नैन याने शानदार गोल करत हिंदुस्थानला बरोबरी साधून दिली. त्यानंतर काही मिनिटांतच नीलकांत शर्मा याने गोल नोंदवत हिंदुस्थानला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱया सत्रामध्ये सुखजीत सिंग याने अप्रतिम फटका मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि हिंदुस्थानची आघाडी 3-1 अशी वाढवली. चौथ्या सत्रामध्ये राजिंदर सिंग याने आणखी एक गोल करत हिंदुस्थानला 4-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
सामना हिंदुस्थानच्या हातात गेला असे वाटत असतानाच पाकिस्तानने अखेरच्या काही मिनिटांत प्रतिकार केला. अबू बकर आणि मोईन शकील यांनी प्रत्येकी एक गोल करत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र हिंदुस्थानी बचावफळीने संयम राखत पाकिस्तानला संधी दिली नाही आणि 4-3 असा विजय मिळविला.





























































