गेट वे ऑफ इंडिया येथील बस थांबा इतरत्र हलवण्यास शिवसेनेचा विरोध, बेस्ट समितीच्या बैठकीत पुन्हा जोरदार खडाजंगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेट वे ऑफ इंडिया येथील बेस्ट बस थांबा स्थलांतराला शिवसेनेने मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत पुन्हा तीव्र विरोध केला. बस थांबा स्थलांतराच्या प्रस्तावावर बेस्ट प्रशासन विचार करेल, असे समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी सांगताच शिवसेनेचे समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. जर प्रशासन परस्पर निर्णय घेणार असेल तर हा मुद्दा बैठकीच्या पटलावर का आणला, असा संतप्त सवाल नांदगावकर यांनी केला.

हजारो मुंबईकर आणि पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरातून गेट वे ऑफ इंडिया येथे जाण्यासाठी बेस्टच्या ए-112 आणि ए-116 या दोन बसगाडय़ांची सेवा आहे. या गाडयांचा थांबा अन्यत्र हलवण्याची मागणी करीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी करताच प्रशासनाने कोणताही विचार न करता बस थांबा दुसरीकडे हलवण्याची कार्यवाही सुरू केली. यावर शिवसेनेचे सदस्य नितीन नांदगावकर, सुनील मोरे, प्रवीणा मोरजकर आणि सचिन पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला.

कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा मंजूर करा!

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य झाल्याबद्दल शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. तसेच बेस्टच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची संप काळातील गैरहजेरी न लावता त्यांना भरपगारी रजा मंजूर करण्यात यावी, अशी सूचना नांदगावकर यांनी केली.

बेस्टच्या नुकसानीला जबाबदार कोण?

मुंबईत विविध मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहेत. यापैकी भुयारी मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान बेस्टच्या बस थांब्यांचे आणि विद्युत वाहिन्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळपास 40 ते 50 कोटींहून अधिक रुपयांच्या नुकसानीला जबाबदार कोण? या नुकसानीची भरपाई कोण देणार? असे प्रश्न समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी उपस्थित केले.

बेस्ट बसगाडय़ांमध्येही ब्लॅक बॉक्सअसावा

मुंबईत बेस्टच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी विमानांप्रमाणे बेस्ट बसगाडय़ांमध्ये ब्लॅक बॉक्स आणि डाटा रेकॉर्डरची व्यवस्था करावी, मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी बसेसचे तातडीने स्वतंत्र सुरक्षा ऑडिट करून एआय ड्रायव्हर मॉनिटरिंग, ब्लॅक बॉक्स आणि ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टम बसवावे, अशी मागणी प्रभू यांनी केली.