राज्यात महिला व बालकांवरील अत्याचारांमध्ये वाढ मुख्यमंत्र्यांची विधानसभेत कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात महिला व बालकांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याची कबुली मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात चालू वर्षात पहिल्या तीन महिन्यांतच अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या ४१ घटना घडल्या, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

आर्थिक पाहणी अहवाल २०२५-२६ नुसार २०२४ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ७९४० तर २०२५ मध्ये ८६४३ घटना घडल्या. तसेच महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाच्या अहवालानुसार २०२४ च्या तुलनेत बालकांवरील अत्याचारांमध्ये ५५५ ने वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. हे अत्याचार रोखण्यास सरकारने काय पावले उचलली, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात राज्यात बालकांचे खून, अपहरण व लैंगिक अत्याचाराच्या घटना घडू नयेत म्हणून राज्य शासनाकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात. अशा प्रकारच्या घटना घडल्या तर तत्काळ कारवाई केली जाते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

गुन्ह्यांची वाढ मोठ्या लोकसंख्येमुळे असल्याचा दावा
महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाच्या अहवालानुसार २०२४ च्या तुलनेत सन २०२५ मध्ये बालकांवरील अत्याचारात ४८२ ने वाढ झालेली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा २०२४ चा अहवाल २०२६ मध्ये प्रकाशित झाला. त्यानुसार २०२४ मध्ये महाराष्ट्रात महिला अत्याचारासंबंधी दाखल गुन्ह्यांची संख्या ४७९५४ इतकी असून त्याबाबत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. मात्र ही संख्या राज्यातील मोठ्या लोकसंख्येमुळे दिसत असल्याचा दावाही त्यांनी केला.