
तब्बल 15 दिवस उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने मुंबईसह उपनगरांना झोडपून काढले आहे. मंगळवारी मान्सूनच्या आगमनाची घोषणा झाल्यानंतर रात्रीपासून मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. दादर, माटुंगा आणि इतर स्थानकांजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या मुसळधार पावसानंतर अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने तो काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पुढील तीन तासांचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Nowcast Warning
Date: 24-06-2026
Time of Issue: 0700 Hrs IST
Validity: 3 hours🟠Orange Warning
Weather: Moderate to intense spells of rain.
Districts: Mumbai, Thane, Raigad, Palghar, SindhudurgTake Precautions
-IMD Mumbai#MyBMCUpdates #MumbaiRains#WeatherUpdates— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 24, 2026
कोपरखैरणे आणि घणसोली दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती वाहून गेल्यामुळे वाशी-ठाणे ट्रान्स हार्बर रेल्वे सेवा काही काळ बंद होती. वसई-विरार परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नालासोपारा, तुळींज, सेंट्रल पार्क, आचोळे रोड, गाळा नगर तसेच वसई आणि विरारमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. रायगड जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्येही पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबईत साडेआठ तासांत विक्रमी पाऊस
राम मंदिर – 224 मिमी (अतिमुसळधार)
कुलाबा – 218.5 मिमी (अतिमुसळधार)
सांताक्रूझ – 210.6 मिमी (अतिमुसळधार)
सायन – 182.5 मिमी
विक्रोळी – 181.7 मिमी
विद्याविहार – 180.7 मिमी
चेंबूर – 180.7 मिमी































































