
लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने देशातील वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांना फोडणे सुरू केले आहे. लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यास भाजप संविधानात संशोधन करून आरक्षण व्यवस्था संपविण्याचे काम करणार आहे, हेच भाजपचे ध्येय आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महासचिव जयराम रमेश यांनी केला आहे. केंद्रातील मोदी सरकार महिला आरक्षणाच्या आडून सर्वात आधी परिसीमनचे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा उद्देशच संपूर्ण आरक्षण व्यवस्था नष्ट करणे हा आहे, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षांतील खासदारांना फोडण्याचे काम भाजप करत आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत दोन तृतीयांश बहुमताचा आकडा गाठायचा आहे. हा आकडा एकदा गाठला की, ते आरक्षण संपवायला मोकळे होतील. सरकारला जर खरंच महिला आरक्षण लागू करायचे असते तर त्यांनी सध्याच्या 543 लोकसभेच्या जागेवरील एक तृतीयांश जागेवर महिलांना आरक्षण दिले असते, असे त्यांनी सांगितले.
भाजपचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कितीही प्रयत्न केले तरी सत्ताधाऱ्यांना लोकसभेत संविधान संशोधनासाठी आवश्यक दोन तृतीयांश बहुमत एकदाही मिळणार नाही, त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे जयराम रमेश म्हणाले. सरकारने महिला आरक्षणाला लवकर लागू करण्यासाठी आणि त्यासंबंधित जोडलेले परिसीमन विधेयक यावर्षी एप्रिल महिन्यात लोकसभेत आणले होते. 17 एप्रिलला झालेल्या मतदानात संविधान संशोधन विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मते पडली होती, असेही ते यावेळी म्हणाले.


























































