शाहू नगरातील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस देणाऱ्यांवर कारवाई करा, शिवसेनेची विधानसभेत मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीच्या शाहू नगर वसाहतीमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस अचानकपणे देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या काळात रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. त्यामुळे ही नोटीस बजावणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि रहिवाशांचे संरक्षण केले जावे, अशी मागणी शिवसेना आमदार महेश सावंत यांनी आज विधानसभेत केली.
शाहू नगर वसाहतीमध्ये ४७ इमारती आहेत. त्यात १४० कुटुंबे राहतात. ४५ वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणात दादर, प्रभादेवी भागातील रहिवाशांची घरे गेली त्यांचे या वसाहतीमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांना घरे रिकामी करण्याची नोटीस कुणी दिली हे पालिकेच्या वॉर्ड ऑफिसरलाही माहीत नाही. मालमत्ता विभागाचे अधिकारी तांबे यांनी ती नोटीस चिकटवली असून घरे रिकामी करण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचे महेश सावंत यांनी सांगितले.
पावसात स्थलांतर करता येणार नाही
कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यात शाहू नगरमधील रहिवाशांना स्थलांतरीत केले जाऊ शकत नाही, तसा सरकारचाच जीआर असताना नोटीस काढली कशी, असा सवाल काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांनी उपस्थित केला. ही झोपडपट्टी नसून रहिवाशांना तिथेच ट्रान्झिट बांधून नव्या इमारती बांधाव्यात, अशी मागणी गायकवाड यांनी केली.