गद्दार बबिता! जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरशी लग्न करण्यासाठी निघालेली पाकिस्तानात, ATS ने ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानमधील बंदी घातलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या कमांडरशी लग्न करण्यासाठी नेपाळमार्गे पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत असलेल्या बबिता धाकड उर्फ ​​खदिजा 38 वर्षीय महिलेला राजस्थान पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केली आहे. बबिता जयपूरच्या सीतापुरा भागातील रहिवासी आहे. मिलिटरी इंटेलिजन्सच्या गुप्त माहितीच्या आधारे रविवारी तिच्यावर कडक UAPA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली असून, सध्या ती 27 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहे.

PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, बबिताने 2025 मधील पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ती अबु उबैदा नावाच्या जैशच्या कमांडरच्या संपर्कात आली. भावनिक जाळ्यात ओढून आणि एका ऑनलाईन मौलवीच्या मदतीने तिचे इस्लाम धर्मात परिवर्तन करण्यात आले होते. उबैदाने तिला लग्नाचे आमिष दाखवून पाकिस्तानात येण्याचे आणि जैश-ए-मोहम्मदसाठी काम करण्याचे आमंत्रण दिले होते. पाकिस्तानात जाण्यासाठी ती नेपाळ, सौदी अरेबिया किंवा युएई या मार्गांचा वापर करणार होती आणि या प्रवासाचा खर्च क्रिप्टोकरन्सीद्वारे केला जाणार होता.

मनी लाँड्रिंग प्रकरण: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली

बबिताच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या फॉरेन्सिक तपासणीत अनेक पाकिस्तानी नंबर आढळून आले आहेत, ज्यामध्ये जैश प्रमुख मसूद अझहरचा जवळचा नातेवाईक युसूफ अझहर आणि हिंदुस्थानात विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला कारी जरार यांच्या नंबरचा समावेश आहे. तिने हिंदुस्थानी मोबाईल क्रमांकांचे ओटीपी तिच्या पाकिस्तानी हँडलरला शेअर केले होते, जेणेकरून ते तिथून हिंदुस्थानी नंबरवर व्हॉट्सॲप चालवू शकतील. याशिवाय, तिने इंटरनेटवर स्फोटके कशी बनवायची याचाही शोध घेतला होता. तपासादरम्यान तिने अनेक तास व्हिडिओ कॉल केल्याची कबुली दिली असून, चौकशीदरम्यान तिच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसून आला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.