
भायखळा येथील सर जे. जे. रुग्णालयात वातानुकूलित यंत्रणेअभावी (एसी) “औषधांचा मृत्यू’’ होत आहे. रुग्णालयाच्या औषध भांडारामध्ये नादुरुस्त झालेल्या एसी यंत्रणेमुळे औषधे खराब होत आहेत. कफ सिरपचा रंग बदलला आहे, तर गोळ्यांचा भुगा होत आहे. ही गंभीर बाब शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिली. जे. जे. मध्ये उपचारासाठी येणाऱ्या हजारो रुग्णांच्या जिवाचा विचार करून याप्रश्नी तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मनोज जामसुतकर यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे जे. जे. रुग्णालयातील गैरकारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. जीवरक्षक औषधे थंड वातावरणात ठेवली नाहीत तर ती खराब व प्रभावहीन होतात. जे. जे. च्या औषध भांडारातील एसी यंत्रणा गेल्या दीड वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत आहे. त्यामुळे तिथे ठेवण्यात येणारी औषधे, गोळ्या, कफ सिरप एक्स्पायरीपूर्वीच खराब होत आहेत. अशा प्रकारची निकृष्ट औषधे रुग्णांना वापरली गेली तर त्यांच्या जिवावरही बेतू शकते, असे जामसुतकर यांनी सांगितले. बरीचशी औषधे फेकूनही द्यावी लागत आहेत. औषध भांडारामध्ये एसी लावण्यासंदर्भात विभागाने सातत्याने रुग्णालय प्रशासनाला सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही जामसुतकर यांनी सांगितले.
खासगी लॅबशी डॉक्टरांचे साटेलोटे
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेरची औषधे लिहून देऊ नयेत असे शासनाचे निर्देश असतानाही जे. जे.तील डॉक्टर बाहेरची औषधे देतात. विविध महागडय़ा तपासण्यांसाठी खासगी लॅबमध्ये पाठवतात. त्यामुळे डॉक्टर आणि लॅब चालकांमध्ये आर्थिक साटेलोटे असल्याचे आरोप होत आहेत, असे जामसुतकर यांनी सभागृहात सांगितले. एमआरआय, सीटी स्कॅन चाचण्यांसाठीही रुग्णांना महिनोन् महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


























































