
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण व राज्यातील मायक्रो फायनान्स कर्जावरील व्याज दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याबरोबरच रत्नागिरीतील महिलांना होणाऱ्या जाचाबाबत रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जनता दल सेक्युलरच्या शिष्टमंडळाला दिले.
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण आणि राज्यातीलही हजारो महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात अडकल्या असून चढय़ा व्याज दरामुळे घेतलेले कर्ज फेडणे या महिलांना अशक्य झाले आहे. यातून आत्महत्येसारख्या घटनाही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, कार्याध्यक्ष प्रभाकर नारकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेऊन मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन देण्यात आले.

























































