
>> बद्रीनाथ खंडागळे
पैठण ते पंढरपूर आषाढी वारीचे प्रस्थान अवघ्या १२ दिवसांवर आलेले असताना अचानक प्रशासनाला जाग आली… केवळ उपचार म्हणून थातुरमातुर बैठक घेऊन ‘पूर्वतयारी’च्या कागदी सूचना देऊन प्रशासन अंतर्धान पावले! दरवर्षी पायी वारी प्रस्थानाच्या एक महिना अगोदर मंत्रालय आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यानगर, धाराशिव, बीड व सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची पायी वारीच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन बैठक होते. मात्र तहसीलदार ज्योती पवार यांना या बैठकीचा विसर पडला. पैठणच्या वारी परंपरेबाबत प्रशासनाने ‘चलता है’ अशी प्रवृत्ती दाखवल्याने वारकरी संप्रदायात संताप व्यक्त होत आहे.
शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज पादुकांच्या आषाढी पायी दिंडीचे ७ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या ५ जिल्ह्यांच्या हद्दीतून १८ दिवसांचा पायी प्रवास करत ही दिंडी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरला पोहोचणार आहे. माऊली समाधीस्थळ आळंदी, तुकाराम महाराजांचे देहू
आणि पैठण येथील संत एकनाथ महाराज या ३ पायी पालख्यांचा मान पंढरीच्या विठ्ठल मंदिरात शेकडो वर्षांपासून आहे. त्यामुळे या वारी परंपरेचे नियोजन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बीड, धाराशिव व कागदी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात येते.
याबाबत संत एकनाथ महाराज यांचे वंशज तथा दिंडी प्रमुख रघुनाथबुवा गोसावी (पालखीवाले) यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, गेल्यावर्षी मुंबईत मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिंडीच्या नागरी सुविधांबाबत चर्चा करण्यात आली होती. नंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. ऊन, पाऊस व वारा झेलत पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्य सुविधा, रस्ता, पिण्याचे पाणी तसेच सुरक्षा याबाबत या बैठकीत उपाययोजना केल्या जात असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पैठणच्या दिंडी सोहळ्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जवळपास ३५ हजार वारकरी सहभागी होतात.
आतापर्यंत पैठण तालुक्याच्या प्रशासकीय स्तरावर बैठका घेऊन नियोजन केले जात होते. मात्र आता हायटेक तंत्रज्ञानाच्या युगात ५ जिल्ह्यांच्या स्तरावर आणि तेसुद्धा ऑनलाईन बैठकांचे नियोजन केले जाते. असे असतानाही यावर्षी मात्र पैठण तालुका प्रशासनाने या बैठकीचे आयोजनच केले नाही. परिणामी वारकरी संप्रदायात प्रथमच प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यात मानाचे तिसरे स्थान असलेल्या संत एकनाथ महाराज पादुका पायी दिंडी सोहळ्याकडे यावर्षी मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
वारी तोंडावर आल्यानंतर घाईगर्दीत बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत वारीच्या पूर्वतयारीवर चकार शब्दानेही चर्चा झाली नाही. मागच्याच वर्षीचा कागद पुढे सरकवून सोपस्कार पूर्ण करण्यात आला. या बैठकीला नायब तहसीलदार राहुल बनसोडे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, माजी नगरसेवक शहादेव लोहारे, आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद अझहर अली, नारायण बंगले, सुहास कामशेट्टी, डॉ. आशमा साहीन, पी.ए. जाधव, आर.बी. ढोले, अन्न औषध प्रशासन विभागाचे विवेक पाटील, दगडी धरण उपअभियंता श्रद्धा निंबाळकर, गणेश खराडकर, महावितरणचे अभियंता सुजित वंगळ, उप कृषी अधिकारी एम. के. निकम, मंडळ अधिकारी कल्पना शेळके, तलाठी शीतल झिरपे, गजानन झोल, कैलास बोबडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.



























































