
पुण्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. सिया ही या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून ती दोषी आढळली तर तिला त्याच किल्ल्यावरून खाली ढकलून द्या अशी उद्विग्न प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिली आहे. जर माझी मुलगी या क्रूर गुन्ह्यात दोषी आढळली, तर तिला कायदेशीर प्रक्रियेचा उशीर न लावता थेट फाशी द्या किंवा त्याच किल्ल्यावर नेऊन दरीत ढकलून द्या, असे ते ‘इंडिया टूडे‘शी बोलताना म्हणाले.
मुलीला अटक झाल्याचा धक्का सहन न झाल्याने प्रवीण गोयल यांना थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझी मुलगी असे काही करू शकते, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. तिने माझ्याशी कधीच खोटे बोलले नाही. पण, एक वडील म्हणून माझ्या भावना मी न्यायाच्या आड येऊ देणार नाही. जर तिने केतनला दरीत ढकलले असेल, तर तिलाही त्याच किल्ल्यावर घेऊन जा आणि त्याच दरीत खाली फेकून द्या. तिला थेट फाशीची शिक्षा द्या, असे ते म्हणाले.
केतन अग्रवालचा खून करण्याआधी त्याची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी एका कॅफेमध्ये भेटले होते. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. pic.twitter.com/hYN3OpmyU8
— Saamana Online (@SaamanaOnline) June 26, 2026
दरम्यान, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून पडून केतनचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असा अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचला. लग्नाला नकार दिल्यास कुटुंबाची बदनामी होईल या भीतीपोटी सियाने हा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी केतनला लोहगड किल्ल्यावरील एका खोल दरीत ढकलून देऊन त्याचा बळी घेतला. यापूर्वीही त्यांनी केतनला मारण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत.
दुसरीकडे, सियाची आई पूजा गोयल यांनी त्यांच्यातील वादाचे वृत्त फेटाळून लावले आहे. केतन आणि सिया यांच्यात कोणतेही मतभेद नव्हते. दोघे नियमित व्हिडिओ कॉलवर बोलायचे, भेटायचे. आम्ही त्यांच्या बाली येथील प्री-वेडिंग ट्रिपसाठी 50 हजार रुपयांची खरेदी देखील केली होती. जर तिला लग्न करायचे नव्हते, तर आम्ही ही तयारी का केली असती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सियाचे दुसऱ्या कोणाशी प्रेमसंबंध होते, याची पुसटशी कल्पनाही कुटुंबाला नव्हती, असा दावाही गोयल यांनी केला.





























































