ठाण्याच्या गावपाड्यांतील गर्भवतींना मिळणार पावसाळ्यात तत्काळ मदत, आरोग्य विभागाचा ॲक्शन प्लॅन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गम भागातील आदिवासी गावपाड्यांमधील गर्भवती मातांना अनेकदा पावसाळ्यात वेळेवर उपचार मिळत नाहीत. प्रसूतीच्या वेदना सुरू झालेल्या महिलांना झोळीतून, खाटेवरून किंवा मानवी साखळी करून रुग्णालयात घेऊन जावे लागत असल्याने माता आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे हा धोका टळावा यासाठी आरोग्य विभागाने एक ॲक्शन प्लॅन तयार केला असून पावसाळ्यातही गर्भवती मातांसाठी २४ तास रुग्णवाहिका, वैद्यकीय सल्ला त्याचबरोबर आशा सेविकांची मदत मिळणार आहे.

मुसळधार पाऊस, खंडित होणारे रस्ते, ओढे-नाले आणि दुर्गम वाड्यापाड्यांमुळे अनेकदा वेळेत रुग्णवाहिका पोहोचणे कठीण होते. काही ठिकाणी तर प्रसूतीच्या वेदना सुरू झालेल्या महिलांना झोळीतून आणण्याची वेळ येते. गर्भवती मातांना वेळीच उपचार मिळावे यासाठी आरोग्य विभागाने एक सर्वेक्षण केले आहे. येत्या ४ महिन्यांत प्रसूती होणार असलेल्या मातांची माहिती घेऊन त्यांच्यासाठी आरोग्य विभागाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. अंबरनाथ तालुक्यात ५, भिवंडीमध्ये २६, कल्याणमध्ये ३३, मुरबाडमध्ये २० आणि शहापूरमध्ये ४२ अशा एकूण १२६ गर्भवती मातांची नोंदणी करण्यात आली आहे.

उपाययोजना कोणत्या?

■ प्रत्येक गर्भवती मातेसाठी रुग्णवाहिकेची माहिती, वाहनचालक, संपर्क क्रमांक यांची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे.

■ आपत्कालीन परिस्थितीत कोणते वाहन उपलब्ध होईल, याची माहिती आधीच संबंधित कुटुंबांना देण्यात आली आहे.

■ प्रसूतीचा कालावधी जवळ येण्यापूर्वी गर्भवती मातांनी प्रसूती केंद्रानजीकच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

■ आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येक गर्भवती मातेला संबंधित आशा स्वयंसेविकेचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.

■ मातांची आरोग्य तपासणी, पाठपुरावा आणि मार्गदर्शन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.