
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. अली गोनी आणि जस्मिन भसीन यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करणाऱ्या या जोडप्याच्या लग्नाची चर्चा पुन्हा रंगली आहे. अली गोनीने नुकत्याच एका मुलाखतीत लग्नाबाबत मोठा खुलासा करत यंदाच विवाहबंधनात अडकण्याचे संकेत दिले आहेत. लग्नाबाबत विचारण्यात आले असता अलीने सांगितले की, अंतिम निर्णय देवाच्या हातात असला तरी कुटुंबीयांकडून आता लग्नासाठी मोठा दबाव येत आहे. “सध्या सर्व काही देवाच्या हातात आहे. मात्र माझ्या कुटुंबाकडून, विशेषत: आईकडून लग्नासाठी खूप आग्रह होत आहे. आई मला आता लगेच लग्न करायला सांगत आहे,” असे तो म्हणाला.
जस्मिन लग्नासाठी तयार आहे का, असा प्रश्न विचारल्यावर अलीने कोणतीही दिरंगाई न करता उत्तर दिले. “जस्मिन तयार आहे. मीही तयार आहे. आता फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहोत. जे काही होईल ते लवकर व्हावे, अशी आमची इच्छा आहे,” असे अलीने सांगितले. यंदाच्या वर्षात म्हणजेच 2026 मध्ये चाहते त्यांच्या लग्नाची अपेक्षा करू शकतात का, असे विचारले असता अलीने हसत “कदाचित” असे उत्तर दिले. त्याच्या या एका शब्दामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली असून लवकरच या जोडप्याकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.
अली गोनी आणि जस्मिन भसीन यांच्या प्रेमकथेची सुरुवात ‘बिग बॉस 14’ या रिअॅलिटी शोमध्ये झाली. सुरुवातीला चांगले मित्र असलेले अली आणि जस्मिन यांची मैत्री पुढे प्रेमात बदलली. शो संपल्यानंतरही दोघे कायम एकत्र दिसत असून सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. गेल्या काही वर्षांपासून “लग्न कधी?” हा प्रश्न या दोघांना वारंवार विचारला जात होता. आता अलीच्या ताज्या वक्तव्यानंतर त्यांच्या लग्नाची चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे.



























































