
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा हिने अमेरिकेतील आपल्या प्रवासाबाबत मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. हॉलिवूडमध्ये सहज संधी मिळाल्या नाहीत, त्यामुळे स्वतःच संधी निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. ‘कान्स लायन्स’ परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान प्रियांकाने आपल्या करिअरमधील संघर्ष, महत्त्वाकांक्षा आणि निर्मिती क्षेत्रात उतरण्यामागील कारण स्पष्ट केले. ‘पीपल’ मासिकाशी बोलताना ती म्हणाली, “मी जे काही करते त्यात स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करते. मात्र प्रेक्षकांचे लक्ष कायम ठेवण्यासाठी सतत बदलत आणि विकसित होत राहणे आवश्यक असते.”
करिअरच्या सुरुवातीला आपण परिपूर्णतेच्या मागे धावत होतो, असे सांगताना प्रियांका म्हणाली, “पूर्वी प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न करायचे. पण नंतर लक्षात आले की चुका मान्य केल्यानेच प्रेक्षकांशी खरे भावनिक नाते तयार होते. मीही माणूस आहे, माझ्याकडूनही चुका होतात.” महत्त्वाकांक्षेबाबत बोलताना तिने सांगितले की, नकार मिळाला की तिची जिद्द आणखी वाढते. “कोणी ‘नाही’ म्हणाले की तेच काम करून दाखवण्याची इच्छा अधिक प्रबळ होते. मनोरंजन क्षेत्रात महिलांसाठी अनेकदा अदृश्य मर्यादा असतात. त्यामुळे अनेकदा स्वतःच मार्ग तयार करावा लागतो,” असे ती म्हणाली. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
हॉलिवूडमध्ये निर्मिती संस्था सुरू करण्यामागील कारण स्पष्ट करताना प्रियांकाने सांगितले की, “मी अमेरिकेत आले तेव्हा मला मुख्य भूमिकेतील काम हवे होते. हिंदुस्थानी कलाकारांसाठी अशा भूमिका स्टुडिओंच्या कल्पनेतही नव्हत्या. म्हणूनच मी स्वतः चित्रपटांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.” तिने पुढे सांगितले की, “मी जेव्हा नव्याने या क्षेत्रात आले तेव्हा मला कोणीही ओळखत नव्हते. त्यामुळे नव्या कलाकारांचा संघर्ष मला चांगला समजतो. माझी निर्मिती संस्था कलाकार आणि निर्मात्यांसाठी एक मजबूत व्यासपीठ ठरावी, अशी माझी इच्छा आहे.”
दरम्यान, प्रियांका सध्या दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यानंतर तिची स्वतःची निर्मिती असलेला ‘रीसेट’ या सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार असून, या चित्रपटात ती ऑर्लॅंडो ब्लूमसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.



























































