
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान एका विशेष कार्यक्रमानिमित्त मंगळुरू येथे पोहोचला असता त्याचे चाहत्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या कार्यक्रमात शाहरुखने आपल्या चित्रपट प्रवासासह बालपणातील अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्याने आपल्या बालपणीच्या एका प्रसिद्ध छायाचित्रामागील हृदयस्पर्शी कहाणी सांगत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान शाहरुखने आपल्या लहानपणीचा एक फोटो उपस्थितांना दाखवला. या छायाचित्रात तो बादलीत बसलेला असून त्याच्या गालावर साबणाचा फेस दिसत आहे. या फोटोविषयी बोलताना शाहरुख म्हणाला, “आताच्या काळात हा फोटो कदाचित काहींना विचित्र वाटेल, कारण त्यामध्ये मी कपड्यांशिवाय आहे. पण माझ्या बालपणातील हा एकमेव फोटो आहे, जो मंगळुरूत काढण्यात आला होता. त्यामुळे हा फोटो माझ्यासाठी खूप खास आहे.”
शाहरुखने सांगितले की, त्याचा जन्म नवी दिल्लीत झाला असला तरी त्याच्या आयुष्यातील सुरुवातीची काही वर्षे मंगळुरूत गेली. त्यामुळे या शहराशी त्याचे एक वेगळे भावनिक नाते आहे. कार्यक्रमात शाहरुखने चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या प्रेमाबद्दल आभार मानले. कन्नड भाषेत उपस्थितांचे अभिवादन करत तो म्हणाला, “धन्यवाद, मंगळुरू! विमानतळापासून कार्यक्रमस्थळापर्यंत तुम्ही दिलेले प्रेम आणि आपुलकी पाहून मी भारावून गेलो आहे. इथल्या लोकांचे प्रेम कायम माझ्या स्मरणात राहील.” असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
यावेळी शाहरुखने आपल्या काही लोकप्रिय गाण्यांवर नृत्यही सादर केले. त्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, शाहरुख खान सध्या दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या ‘किंग’ या बहुचर्चित चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच मुलगी सुहाना खानसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याशिवाय दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात असून तो 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.




























































