
गेल्या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये हिंदुस्थानचे सहा जवान शहीद झाले होते. त्यांची नावे प्रथमच सार्वजनिक करण्यात आली आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांची नावे राष्ट्रीय युद्धस्मारकाच्या वेबसाईटवर ‘रोल ऑफ ऑनर’मध्ये जोडण्यात आली आहेत. याशिवाय राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय युद्धस्मारकाच्या 3डी वॉलवर वर्ष 2025च्या भागातदेखील या जवानांची नावे कोरण्यात आली आहेत.
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 25 पर्यटकांसह एका स्थानिकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हिंदुस्थानी सैन्याने 6 आणि 7 मे च्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकव्याप्त कश्मीरमध्ये हल्ले करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानात 4 दिवस हवाई युद्ध भडकले होते. अखेर पाकिस्तानने गुडघे टेकवून युद्धबंदीची विनंती केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहा जवान शहीद झाले होते. त्यापैकी दोघांना मरणोत्तर शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. रायफलमॅन सुनील कुमार यांना मरणोत्तर वीरचक्र तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना मरणोत्तर वायू सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
या जवानांनी दिली प्राणांची आहुती
लान्स नायक दिनेश कुमार (5 फिल्ड रेजिमेंट), एव्हिएटर अग्निवीर मूड मुरली नायक (851 लाईट रेजिमेंट), सार्जंट सुरेंद्र कुमार (39 विंग, हवाई दल), सुभेदर मेजर पवन कुमार (10 इन्फण्ट्री ब्रिगेड), रायफलमॅन सुनील कुमार (4 जम्मू-कश्मीर लाईट इन्फण्ट्री), हवालदार सुनील कुमार सिंह (237 फिल्ड वर्कशॉप कंपनी) यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान देशासाठी प्राणांची आहुती दिली.
‘त्यागचक्र’मध्येही स्वर्णाक्षरांनी नोंद होणार
राष्ट्रीय युद्धस्मारकाच्या ‘त्यागचक्र’मध्येही एका विशेष विटेवरही या जवानांची नावे कोरण्यात येणार आहेत. त्यागचक्रमध्ये ग्रॅनाईटच्या 16 गोल भिंती आहेत. त्यावर देशाच्या स्वातंत्र्यापासून शहीद होणाऱ्या प्रत्येक जवानाचे नाव, रँक आणि युनिटचे नाव स्वर्णाक्षरांनी कोरण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी 26 हजारांपेक्षा जास्त वीरसैनिकांची नावे कोरण्यात आलेली आहेत.
- दिनेश कुमार
- मूड मुरलीनायक
- सुरेंद्र कुमार
- पवन कुमार
- सुनील कुमार
- सुनील कुमार सिंह





























































